Thursday 7 July 2016

सरस्वतीचा गाभारा रिकामा झाला!

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य सरस्वतीचा गाभारा रिकामा झाला आहे, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांना मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांची समन्वयशील संशोधनवृत्ती पुढील पिढीपर्यंत नेण्याचे कार्य हीच
त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावनाही या वेळी व्यक्त झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. रा. चिं. ढेरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर, जयराम देसाई, सु. वा. जोशी, बाबुराव कानडे, पं. वसंतराव गाडगीळ, डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. न. म. जोशी, सदा डुंबरे, अरुण खोरे, अरुण जाखडे यांनी आपल्या मनोगतातून ढेरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. ढेरे यांची कन्या वर्षां गजेंद्रगडकर यांनी ‘अण्णां’ना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. माजी आमदार उल्हास पवार, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या. अनेक साहित्यिकांनी उपजीविकेसाठी नोकरी केली. पण, गोनीदा यांच्याप्रमाणे ढेरे केवळ साहित्यावरच जगले, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. ढेरे हे व्रतस्थ आणि निगर्वी संशोधक होते, असे डॉ. देशपांडे म्हणाले. प्रा. जोशी म्हणाले, सध्या ज्ञानाचे क्षेत्र व्यक्ती आणि विचारद्वेषाने गढूळ झाले आहे. संशोधननिष्ठा अव्यभिचारी ठेवणे अवघड झालेले असताना संशोधन क्षेत्राला समग्रतेचे भान देणाऱ्या अण्णांच्या कार्याचे महत्त्व ध्यानात येते. गजेंद्रगडकर म्हणाल्या, डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या माध्यमातून अण्णांच्या मनातील प्रकल्पांना मूर्त स्वरूप प्राप्त व्हावे हा मानस आहे. त्यांची समन्वयशील संशोधनवृत्ती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि अण्णांच्या कामाला गती देणारे युवक घडावेत ही भूमिका आहे. सबनीस म्हणाले, संशोधकाचा मृत्यू होतो तेव्हा काळच थांबत असतो. त्यामुळे ढेरे यांचे निधन हा संस्कृतीच्या संचिताला धक्का देणारे आणि चटका लावणारे असेच आहे. त्यांच्या समन्वयवादी संशोधनाला विद्याशाखीय आणि भक्तीपरंपरेचा आयाम होता.

No comments:

Post a Comment