Thursday 7 July 2016

डॉ. झाकिर नाईक एनआयए'च्या रडारवर

नवी दिल्ली - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आणि वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाईक हे सध्या सौदी अरबला गेले आहेत. ते देशात परतल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
बांगलादेशातील ढाका येथे गेल्या शुक्रवारी दहशतवाद्यांनी एका भारतीय युवतीसह वीस जणांची हत्या केली होती. या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी डॉ. नाईक यांचे नाव घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन आपण दहशतवादी बनलो. आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, असे सांगितल्याचे उघड झाल्याने ते चर्चेत आले आहेत. ते मुस्लिम तरुणांना दहशतवादी बना, असा संदेश देत असतात. त्यांच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी यापूर्वी अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र डॉ. नाईक यांनी हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात भाष्य केलेले नाही आणि हिंसेला प्राधान्य देणारे वक्तव्य केलेले नाही, असा दावाही ते करतात. ढाका हल्ल्यातील दहशतवाद्यांनी थेट डॉ. नाईक यांचेच नाव घेतल्याने भारतातील तपास यंत्रणा त्यांची वादग्रस्त भाषणे पुन्हा तपासणार असल्याचे समजते. या हल्ल्यानंतर बांगलादेश सरकारने भारत सरकारला त्यांच्या भाषणातील आशय तपासण्याची विनंती केली आहे. डॉ. नाईक यांचे जगभर समर्थक पसरले आहेत. सोशल मीडियावर त्यांची भाषणे उपलब्ध आहेत. बांगलादेशचे माहिती मंत्री हसनुल हक इनू म्हणाले, की ढाक्‍यातील काही धर्मगुरूंनीही डॉ. नाईक यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या. देशात शांतताप्रक्रिया प्रस्थापित होण्यासाठी त्यांच्या भाषणाचा समावेश करू नये, अशी मागणीही करण्यात आली होती. डॉ. झाकिर नाईक इस्लाम धर्माविषयी कोणती शिकवण देतात. त्यांनी आतापर्यंत केलेल्या भाषणाचा तपासही भारत सरकारने करावा, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment